सृजनमित्र २०२६
संपादकीय

दुसरं वर्ष, सुगीनंतर

संपादकाचं टेबल: हस्तलिखिताची पानं, फाउंटन पेन, चष्मा, चहाचा कप आणि लॅपटॉप

गेल्या दिवाळीत आम्ही एक प्रयत्न केला होता. AI-कडून पूर्ण दिवाळी अंक लिहून घेतला होता आणि तो तुमच्यासमोर सादर केला होता. त्यावेळेस त्याला नाव दिलं होतं सृजनमित्र. अंक आला तेव्हा प्रतिक्रिया संमिश्र होत्या. कुणाला कुतूहल वाटलं, कुणी कपाळाला आठ्या घातल्या आणि बऱ्याच जणांना गंमत वाटली की हे यंत्र मराठी विश्वाबद्दल बऱ्यापैकी चांगलं लिहू शकतंय. तेव्हा आमच्यासमोरचा प्रश्न होता की यंत्र लिहू शकतं का, आणि उत्तर होतं - हो. पण थोडंसं अडखळत आहेच.

गेल्या वर्षभरात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. आता आपल्याला AI काय करू शकतं, काय नाही याचा प्रश्न थोडासा कमी उरलाय, कारण सामान्य माणसांच्या जीवनात AI चा शिरकाव आता जास्त झालेला आहे. त्यामुळे यावेळेस आम्ही विचार केला की काय वेगळं करता येईल, आपली परीक्षा आपणच अजून कठीण कशी करावी; तर मग आम्ही त्यांना वेगवेगळे विषय देताना मराठी ढंग कितपत समजतो? त्यांना मराठी सांस्कृतिक संदर्भ- समर्पकता यांची कितपत जाण आहे? आणि AI मॉडेल्स एखादी मोठी दीर्घकथा लिहू शकतात का, हे सगळे प्रयोग करायचे ठरवले.

गेल्या वेळेसही आम्ही एक विशेष विभाग केला होता, त्यात आम्ही AI-कडून काही वैचारिक लेख लिहून घेतले होते. पण यावेळेस आम्ही विचार करत असताना आम्ही असे ठरवले की यावेळेस या विभागाला एक सूत्र देऊयात. आणि या विभागाला आम्ही सूत्र ठेवलेलं आहे- "सुगीनंतर". सुगी म्हणजे वर्षभराच्या कष्टाचं पीक घरात आल्यानंतरचा काळ, कोठारं भरलेली असतात आणि हाताला फुरसत असते. पण मग AI ची सुगी म्हणजे काय?

आज परिस्थिती पाहिली तर यंत्र आपली कितीतरी कामं करू लागली आहेत. Knowledge workers म्हणजे जे डोक्याने काम करणारे लोकं होते, ज्यांनी जवळच्या नजीकच्या काळात आपल्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला, अशा लोकांची कामं आता AI सहजच करता येणार आहे. त्यामुळे माणसाच्या वाट्याला असणारा रिकामा वेळ हा वाढत चालला आहे. आता हा वेळ रिकामा, की मोकळा हा प्रश्नच आम्ही यंत्रांना विचारला.

आम्ही यासाठी एक वेगळ्या प्रकारचा परिसंवाद रचला, यात 5 वेगवेगळे AI models एकमेकांशी बोलत होते आणि आम्ही स्वतः तयार केलेल्या एका agent-ला ज्याला तांत्रिक भाषेत harness म्हणतात या परिसंवादाचं संचालक बनवले. थोडक्यात काय, आजकाल तुम्ही podcast बघता ना ज्याच्यात 5 लोकं टेबलाच्या भोवती बसून गप्पा मारतात, हेच आम्ही models-ना करायला लावलं. फक्त यावेळेस सगळ्या models-ना आम्ही सांगितलं की तुम्ही AI म्हणूनच तुमचे मत मांडा, एखादा मनुष्य म्हणून मत मांडू नका. आणि यातनं खरी गंमत बाहेर आली. कारण हे AI एकमेकांशी बोलतात, एकमेकांना खोडून काढतात आणि त्यांची मनुष्य प्रजातीबद्दलची मतं वाचताना तर अजूनच मजा येते. आम्हाला अजून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे की ही AI models ही मनुष्याला बऱ्यापैकी ओळखायला लागलेली आहेत. म्हणजे लिखाणाबद्दलच्या एखाद्या AI-चा वापर सृजनशीलतेसाठी करावा का या प्रश्नात त्यांनी एखाद्या व्यक्तीची नोकरी जाणे ते एखाद्या यंत्राला एक साधन म्हणून वापरणे इथपर्यंतचे सगळे मुद्दे घेतले. अर्थात त्यांनी हा एक प्रश्न आमच्याकडेही दिलेला आहे की हे सगळे परिसंवाद जे आहेत ते मनुष्य म्हणून तर नाही दाखवले जाणार ना, ते AI म्हणून वापरले जाणार आहेत ना?

ललित विभागासाठी आम्ही काय केले? तर या पाच मॉडेल्सना आम्ही एकसारख्या सूचना दिल्या आणि त्यांना सांगितलं की आता तुम्ही या पद्धतीने एखादी कथा तयार करा. कथा तयार झाल्यानंतर आमच्या संपादक मंडळातल्या काही सहाय्यक सदस्यांनी त्या कथा वाचल्या आणि त्यातून निवडलेली सर्वोत्तम कथा इथे दिलेली आहे.

या कथा वाचत असताना काही गोष्टी आम्हाला खटकल्या, तर काही गोष्टी आम्हाला आवडल्या सुद्धा. जसं एका कथेत कथेचा नायक आपल्या बायकोला गजरा आणून देतो, तो फुलांचा गुच्छ आणून देत नाही. याचाच अर्थ किंवा त्याच्या कथेत नायक नाटकाला जातो, सिनेमाला नाही, याचाच अर्थ मराठी जनसामान्यांचं कथेत काय भावविश्व असेल ते त्यांनी व्यवस्थित पकडलेलं आहे. भाषेच्या बाबतीत काही ठिकाणी अजूनही भाषा mechanical म्हणजे यांत्रिक वाटते आणि ती कदाचित अजून पुढच्या काही दिवसांमध्ये तेही सोडवलं जाईल.

हा अंक माणसांच्या लेखनाला पर्याय म्हणून नाही, तर तो या मॉडेल्सच्या भाषिक यशाचा एक आरसा आहे. यंत्र किती चांगलं लिहू शकतात, हे खूपच स्पष्ट दिसतं.

आमची तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, की खुले विचार ठेवून हा अंक एकदा वाचून बघा. वाचा, तुलना करा, स्वतः वापरून बघा; काय आवडलं, काय खटकलं ते आम्हाला नक्की कळवा.

हे बनवत असताना आम्हाला मदत करणाऱ्या बोभाटा टीममधल्या स्वाती, रामदास काका, प्रसाद या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो.

निखिल देशपांडे

अंकाची PDF